मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

अस्तित्व..


                अस्तित्व
खरंच प्रत्यक्ष मृत्युचा वावर,
तुमच्या खूर्चीभोवती होता का?
म्हणूनच सहज निमित्त काढलात देशाटनाचं,
आम्हाला दुःख होऊ नये म्हणून.
          जाताना सांगून गेलात,
         मी परत येणार लगेच.
         खूप कामे करायची आहेत,
         असेही आपण म्हणालात.
आम्ही वाट पाहात राहिलो,
आपल्या परतीची.
प्रकृती थोडी अस्वस्थ आहे,
असे आपणच कळविलात.
पण मी एकदम ठीक होईन, काळजी नको
असे तुम्हीच अश्वस्त केलात.
       वयाची ऐंशी उलटली तरी,
       आयुष्यभर कोसो दूर राहिलात
       त्या सलाइन्स, इंजेक्शन्स आणि
       औषध गोळ्यांच्या कचाट्यातून.
       त्यामुळे आम्हीही निश्चिंत होतो,
       आपण नक्की परत येणार या आशेवर.
कारण..
काळाच्या उदरात दडलेल्या इतिहासाची
अजून अनेक पाने,
तुम्ही नव्याने लिहिणार होतात.
मांडणार होतात पट ऐतिहासिक घटनांचा,
अन् अपरिचित जीवनचरित्रांचा.
       आपण लिहिलेल्या इतिहासातून
       आम्हाला आता कोठे कळत होती,
       ती मौल्यवान पात्रे
       अन् कर्तृत्ववान व्यक्तिचित्रे.
इतकं आपण लिहूनही, इतकं आपण देऊनही
रितेपणा जाणवतोय, अपूर्णता वाटतेय.
खरंच आणखी खूप शिकायचे होते,
आपल्याकडून, आपल्या नवनिर्मितेतून.
       मी, माझे हे संकुचितपण तुम्हाला कधी शिवले नाही.
       पण, आपल्या औदार्याचे भांडवलही कधी केला नाहीत.
        उथळ सवंगपणाची आपल्याला मनस्वी चीड,
       म्हणूनच कोणत्याही व्यासपीठाकडे कधी झुकला नाहीत.
राईचा पर्वत दाखवून मेखी मिरविणाऱ्यांच्या भाऊगर्दीतही,
तुम्ही राहिलात स्थिर, शांत.
करत राहिलात साधना सारस्वतांच्या प्रतिभेची,
अन् उजेडात आणलात प्राचीन ते अर्वाचीन भारत.
       इतकं करूनही एखादं आत्मचरित्र लिहिण्यापेक्षा
       तुम्ही व्यग्र होता,
       जुन्या इतिहासांच्या पानांतून
       नव्या चरित्रांच्या शोधात.
पण...
आपण गेलात आणि
आम्ही स्तब्ध झालो, अंतर्मुख झालो.
आपला वावर, आपली आठवण,
आपली पुस्तके, आपली खुर्ची,
अन् समोरच्या टेबलावर पुस्तकांच्या गराड्यात अलगद
हळुवार अक्षरांनी आपण रेखाटलेल्या नोंदींची टिपणे..
       हे सर्व आम्हाला
       वारंवार खुणावताहेत
       जाणीव करून देताहेत
       आपल्या अस्तित्वाची
       आपल्या अजोड कार्याची.....

       
-          सरोजकुमार सदाशिव मिठारी
  विद्याव्यासंगी सहायक संपादक
  महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.

बुधवार, २५ जून, २०१४

सुप्रभात

रस्ता सुंदर असेल, तर नक्की विचारा तो कोठे जातो?
पण ध्येय सुंदर असेल, तर तो रस्ता कसा आहे हे पाहू नका,
फक्त त्या रस्यावर चालत राहा........अखेर साध्य होईल ते तुमचे सुंदर ध्येय.